गुरुवार, १३ मार्च, २०१४

वास्तूतील दिशा आणि धनलाभ

 वास्तूतील दिशा आणि धनलाभ

विलास आणि अमृता ह्यांचा अचानक धनप्राप्तीचा मार्ग हा बंद झाला. म्हणजे त्याचे झाले असे की विलास आधी जिमचा मालकही होता आणि Instructor ही. अमृताही नोकरी करत होती. विलासचे गेल्या दोन वर्षापासून पाठीचे दुखणे इतके वाढले होते कि त्याला जिम मध्ये काम करता येईना. डॉक्टरांनी स्लीप डिस्कचे निदान केले. त्यामुळे नाईलाजाने  ऑक्टोबर २०१३ ला विलासने जिम दुसऱ्या व्यक्तीच्या स्वाधीन केली. त्याचकाळात काही कारणांमुळे अमृताला नोकरी सोडावी लागली. नवीन घराचे हफ्ते,विलासचा औषधांचा खर्च,घरचा इतर खर्च आणि पैशांची आवक एकदम बंद. दोन-तीन महिन्यानंतरही परिस्थिती जैसे थे असल्याने अमृताच्या मैत्रिणीने तिला मला भेटण्याचा सल्ला दिला. 

त्याप्रमाणे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ही जोडी मला भेटण्यास आली होती. सुरवातच तक्रारीने झाली. अमृताचा प्रश्न होता आर्थिक स्थैर्य कधी येईल ? तिचे म्हणणे असे कि ह्या वास्तूत राहायला आल्यापासून प्रोब्लेम्स सुरु झालेत. जेंव्हा अचानक कुटुंबातील कर्त्या पुरुषाला आर्थिक अस्थैर्य येतं तेंव्हा वास्तूच्या नैऋत्य स्थानात नक्कीच गडबड असते. जर नैऋत्य दिशेत Cut असेल किंवा त्या दिशेत Toilets असतील तर त्या दिशेतील negative energy कर्त्या पुरुषाला नक्कीच प्रभावीत करते आणि त्याचा परिणाम म्हणजे नोकरी अचानक सुटणे,व्यवसायात नुकसान होणे,घरात आर्थिक चणचण भासणे. म्हणून मी विलासला विचारले तुमच्या वास्तूच्या दक्षिण- पश्चिम दिशेत Cut आहे का ? त्या दिशेत Toilets आहेत का ? पण प्रत्येक जातकाप्रमाणे त्याचे उत्तर,"कल्पना नाही मैडम. तुम्ही स्वतः ह्या गोष्टींचा पडताळा केलात तर बरे". मी म्हटलं,"ठीक आहे". मग वास्तूपरिक्षणाचा दिवस ठरला. 

वास्तू परिक्षण झाल्यानंतर निघालेले निष्कर्ष खालीलप्रमाणे : 

विलासची वास्तू 

१) वास्तूला नैऋत्य( South West direction ) दिशेत मोठा Cut आहे. त्याच दिशेत Toilets आहेत. ह्या दोन्ही गोष्टी त्या दोघांच्या लक्षात आणून दिल्या. आणि toilets नुसतेच नैऋत्य दिशेत नसून संपूर्ण वास्तूच्या ब्रम्हस्थानात आहेत. मागच्या बरयाच लेखात मी हे निर्देशनास आणून दिले आहे कि ब्रम्ह्स्थान जर दूषित असेल तर पुरुषांना पाठीच्या कण्याचा त्रास/हृदय विकार/स्त्रियांना गर्भाशयाचा त्रास होतोच. इथेही तो परिणाम मिळालेला आहे. 

२) वास्तूच्या कोपरयात मुख्य दिशा येत आहेत. म्हणजेच कुठलीही दिशा हे वास्तूच्या समोर नसून कोपरयात आहे. अशा वास्तूला "विदिशा वास्तू" म्हणजेच दिशाहीन वास्तू समजले जाते. अशी वास्तू स्वतःच्या/कुटुंबाच्या प्रगतीसाठी अजिबात अनुकुल ठरत नाही. 

३) मी विलासला म्हणाले," तुमच्या वास्तूचे मुख्य प्रवेशद्वार आग्नेय दिशेत आहे. आग्नेय दिशेत जर दरवाजा असेल किंवा खिडकी असेल तर स्त्रियांना गुडघ्यांचा त्रास होतोच.घरात कुठल्या स्त्रिला (घरात एकूण दोन स्त्रियांचे राज्य - अमृता आणि अमृताच्या सासूबाई) गुडघ्यांचा त्रास आहे ?" अमृताचे डोळे अक्षरशः विस्फारले गेले. दोघेही एकमेकांकडे आणि नंतर माझ्याकडे बघू लागले. मी म्हटले,"काय झाले ?" त्यावर अमृताचे उत्तर,"अहो गेल्या दोन वर्षापासून मला गुडघे दुखीचा त्रास होतोय आणि ह्या दिवाळीच्या आधी तो इतका वाढला कि मी प्रवास करून नोकरीला जाणे अशक्यच झाले. त्यामुळे नाईलाजाने नोकरी सोडावी लागली. सध्या तो त्रास इतका वाढला आहे कि डॉक्टर म्हणालेत गुडघ्यांमध्ये "Gap" वाढली आहे आणि कदाचित ऑपरेशन करावे लागेल. (आग्नेय दिशेत Cut - गुडघ्यांचा त्रास )
४) आता ह्या सर्व गोष्टी बदलता येणे तर शक्य नाही त्यामुळे पुढे काय ? हा प्रश्न अमृताकडून (अपेक्षित)आला. मी म्हटले," इथे दोन्ही कडून समस्या आहेत अमृता. एक तर पैशांची आवक पूर्णपणे ठप्प आणि आहेत ते पैसे आजारपणात खर्च होत आहेत. हे बघ कुठलीही वास्तू संपूर्णपणे वाईट नसतेच. ह्या वास्तूत सर्वात चांगली आणि धनप्राप्तीसाठी उपयुक्त असलेली दिशा म्हणजेच उत्तर आणि ईशान्य दिशा. आणि तुमच्या वास्तूत असलेल्या सर्व मोठ्या खिडक्या ह्याच दिशेत आहेत. ह्याचा आपण नक्कीच उपयोग करून घेऊ." 

लोकांची साधारण अशी प्रवृत्ती असते की आहे खिडकी तर ठेव अडगळ तिथे. ठेवा रद्दी,वापरात नसलेल्या चप्पला, पुन्हा कधी वापरात न येणारयाही वस्तू. ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. अमृताचे घरही त्याला अपवाद नव्हते. त्यांनी सर्व अडगळीच्या वस्तू, वापरात नसलेले Fish Tank,रद्दी, चप्पला इ. तिथे ठेवलेले होते. अमृताला तत्काळ तिथली रद्दी,अडगळीच्या वस्तू भंगार मध्ये काढून टाकण्यास सांगितले. चप्पल ठेवण्याची दिशाही ठरवून दिली. 

५) जातकाच्या तब्येतीचा आणि त्याच्या वास्तूचा जसा संबंध आहे तसाच जातक वास्तूमध्ये कुठल्या दिशेत जास्त काळ व्यतीत करतो त्यालाही महत्व आहे. म्हणून मी विलासच्या वास्तूतील आवडत्या जागेबद्दल विचारल्यावर दोघानांही हसू फुटले. अमृता म्हणाली विलासची एक स्पेशल खुर्ची आहे. त्या खुर्चीत तो कोणालाच बसू देत नाही. आम्ही मस्करीत त्या खुर्चीला "सिंहासन" म्हणतो. मी विचारलं,"आहे कुठे हे सिंहासन ?" मग अमृताने ती खुर्ची/जागा दाखवली. ( वर वास्तूच्या नकाशात ती जागा निर्देशित केली आहे. )  ती जागा होती ब्रम्ह्स्थानातच आणि मुख्य म्हणजे toilet च्या भिंतीला लागुनच. तत्काळ मी विलासला जागा बदलण्यास सांगितले.(ब्रम्ह स्थानातात सतत बसल्याने वैचारीक चंचलता वाढते. ) विलासला त्याच्या तब्येतीच्या सुधारणेसाठी मी बैठकीच्या खोलीतील पूर्वोत्तर(ईशान्य ) दिशेतील खिडकीजवळ  जागा ठरवून दिली. 

६)विलासच्या औषधांची जागा ठरवून दिली ज्यामुळे औषधांचा त्वरित चांगला परिणाम मिळावा. 

७) नैऋत्य दिशेत जिथे cut आहे त्याच ठिकाणी स्वयंपाक खोलीला खिडकी आहे. म्हणजे त्यादिशेतील Negative उर्जा त्या खिडकीतून आत येत आहे . त्यासाठी अमृताला खिडकीत ठराविक झाडाचे छोटेसे रोप सध्या ठेवण्यास सांगितले जेणे करून येणारी negative  उर्जा संकुचित होईल. 

८) ह्याच बरोबरीने उत्तर दिशेत काही ठराविक वस्तू ठेवण्यास सांगितल्या ज्यामुळे पैसे येण्याचा मार्ग सुकर होईल. त्याचबरोबरीने दोघानांही दररोज प्राणायाम,दीर्घ श्वसनाच्या क्रिया,(डॉक्टरांकडून Confirm करुन मगच  विलास आणि अमृताला श्वसनाच्या क्रिया करण्यास सांगितल्या) वाचनात श्री सूक्त  ७ वेळेस, गायत्री मंत्राचा जप आणि इतरही उपाय लिहून दिले. 

त्यानंतर साधारण आठ दिवसांनी अमृताचा फोन आला. अत्यंत खुश होती ती. ह्या आठ दिवसात उत्तर दिशेतील अडगळ काढून टाकण्यात आली होती. विलासची जागा बदलली गेली. स्वयंपाक खोलीच्या खिडकीत सुचविलेले रोप कुंडीत ठेवले गेले. सुचवलेली स्तोत्र/जप आणि बाकी उपायही सुरूच होते. आणि अमृताच्या भाषेत,"मैडम आम्हांला एका ठिकाणाहून काही लाखांचं येण बाकी होत आणि कालच त्यांच्याकडून ते सर्व पैसे मिळाले. घरी आधी जशी मरगळ वाटायची ते अजिबात नाहीये उलट आता खूपच फ्रेश वाटतं आणि अचानक झालेली ही धनप्राप्ती सध्या खूप मोठा आधार आहे. घराचे हफ्ते फेडण्यापेक्षा आम्ही बैंकेचं कर्जच फेडून  आलो. म्हणजे दर महिन्याचं टेन्शनही कमी. आता फक्त आमच्या दोघांच्या तब्येतीत सुधारणा होण्याची वाट बघतोय."  मी म्हणाले,"होईल होईल त्यातही लवकरच सुधारणा होईल. आपले बाकीचे उपाय आपण करून घेतलेत कि तीही सुधारणा दिसेल". 

Note  :इथे ब्रम्हस्थान दुषित असल्याने त्या जागी रत्नाध्याय सुचविण्यात आला होता. ह्या रत्नाध्यायात काही ठराविक मंत्रोक्त रत्ने ठराविक मुहूर्तावर वास्तूच्या ब्रम्ह स्थानात प्रस्थापित करण्याचा सल्लाही दिला होता. (तब्येतीसाठी) हा उपाय येत्या महिन्यात करण्यात येणार आहे. त्यानंतर तब्येतीची सुधारणा अपेक्षित आहे. 

त्याचप्रमाणे अमृताच्या तब्येतीसाठी बाकी उपायांबरोबरच वास्तूतील आग्नेय दिशेत असलेल्या मुख्याद्वारासाठी ठराविक धातूची मंत्रोक्त पट्टी प्रस्थापित करण्याचा सल्ला दिला आहे. त्याप्रमाणे येत्या महिन्यात तो ही  उपाय विलास करून घेणार आहे. त्यांनतर तिच्याही तब्येतीत सुधारणा दिसू लागेल. 

Very Important :  जसे डॉक्टर रुग्णाला बरे होण्यासाठी औषधांबरोबर थोडा व्यायाम,जेवणाची पथ्ये देतात आणि त्यानंतर त्या रुग्णात सुधारणा दिसू लागते त्याचप्रमाणे नुसतेच वास्तूला औषधे न देता,त्या वास्तूत राहणाऱ्या व्यक्तींनाही पथ्ये पाळावी लागतात तरच गुण येतो. 

मंगळवार, ४ मार्च, २०१४

Missing Person - तो परत येईल का ??

Missing Person -  तो परत  येईल का ??

मार्चच्या पहिल्या तारखेला सकाळी ८.३३वाजता ज्योतीचा फोन. एवढ्या सकाळी फोन केला म्हणजे नक्कीच अत्यंत गंभीर प्रश्न असणार. ज्योतीचा प्रश्न तिच्या मैत्रिणीच्या नवऱ्याबाबत होता. "मैडम माझ्या मैत्रिणीचा नवरा शेखर जो software Engg आहे तो काल संध्याकाळपासून घरीच आलेला नाही. म्हणजे सकाळी नेहेमीप्रमाणे कामावर गेला आणि निघतांना संध्याकाळी त्याचा फोन सुद्धा आला होता कि ऑफिस मधून निघतोय म्हणून. पण नंतर रात्री उशीरापर्यंत तो घरीच आला नाही. आता तर त्याचा फोनही लागत नाहीये. सहसा कामावरून तो लगेच घरीच येतो आणि खूप साधा मुलगा आहे. घरी अत्यंत काळजीचे वातावरण झालेय."  मी म्हटले," ठीक आहे तुला कळवते थोड्या वेळेत". 

दिवसाचा पहिलाच प्रश्न असल्याने प्रश्न कुंडलीने सोडवायचे ठरवले :

प्रश्न विचारला तेंव्हाची कुंडली आणि शासक ग्रह खालील प्रमाणे : 


प्रश्न कुंडली 

शासक ग्रह :  

L  - गुरु(वक्री) ४, १, १०   न. स्वा.-  राहू ७, ३, ८ 
S  - राहू ७, ३, ८            न. स्वा. - राहू ७, ३, ८ 
R  - शनि ८, ११, १२       न. स्वा. - गुरु(वक्री) ४, १, १० 
D  - शनि ८, ११, १२       न. स्वा. - गुरु ४, १, १० 

हरवल्येल्या अथवा परागंदा झालेल्या व्यक्तींबद्दल काही जाणून घ्यायचे झाल्यास प्रश्न कुंडली अत्यंत उपयुक्त ठरते. सर्वात आधी मनात प्रश्न येतो तो हा कि,


 ही व्यक्ती सुखरूप आहे का ?(जिवंत आहे ना ?) 
ह्या प्रश्नाचे उत्तर हवे असल्यास नियम असा आहे की लग्नाचा सब लॉर्ड जर शासक ग्रहांमध्ये असेल तर व्यक्ती हयात असते. शेखरच्या case मध्ये लग्नाचा सब लॉर्ड गुरु आहे आणि तो शासक ग्रहांमध्ये आहे. त्यामुळे शेखरच्या मृत्यूची शक्यता नाहीच. परंतु  लग्नेश गुरु स्वतः वक्री आहे. लग्नेश जर वक्री असेल तर व्यक्तीला काही इजा झाली असण्याची शक्यता असते.      कुंडलीतील चंद्र हरवल्येल्या व्यक्तीबद्दल माहिती देतो.चंद्रावर गुरुची दृष्टी आहे. (म्हणजेच शेखर Safe आहे.) कुंडलीत चंद्र व्यय स्थानात कुंभ राशीत रविच्या युतीत आहे. चंद्र व्ययात असेल तर व्यक्ती हॉस्पिटल/जेल किंवा बंधनात असणे - Kidnapping असू शकेल. चंद्र जर पापग्रहांबरोबर असेल तर व्यक्तीला कोणीतरी डांबून ठेवले असण्याची अथवा गुंडांच्या तावडीत सापडली असण्याची शक्यता असते. 

व्यक्ती कुठे आहे ?

पुढचा येणारा प्रश्न म्हणजे जर व्यक्ती जिवंत आहे तर ती आहे कुठे ? त्यासाठी नियम असा आहे कि चंद्र जर स्थिर राशीत असेल तर व्यक्ती एका जागी असते. जर चंद्र चर राशीत असेल तर व्यक्ती प्रवासात असते. इथे चंद्र कुंभ राशीत म्हणजेच स्थिर राशीत आहे. ह्याचाच अर्थ शेखर एकाच ठिकाणी आहे आणि प्रवासात नाही. चंद्र जर केंद्र स्थानात असेल तर व्यक्ती राहत्या शहराच्या आसपासच असते परंतु ह्या कुंडलीत चंद्र केंद्रात नाही  म्हणजेच शेखर स्वतःच्या घरापासून बराच लांब असण्याची शक्यता आहे. 

हरवल्येल्या व्यक्ती बरोबर कोण आहे का ?

ह्या प्रश्नासाठी चंद्राबरोबर असणारे ग्रह तपासावेत. इथे चंद्राबरोबर रवि सारखा "पापग्रह" आहे (युतीत आहे.) चंद्र रवि बरोबरीनेच नेपच्यून बरोबर सुद्धा युतीत आहे. (काही ज्योतिषी हर्षल, नेपच्यून आणि प्लुटो सारख्या ग्रहांचा विचार करत नाहीत परंतु ह्या Case मध्ये मी आवर्जून ह्याचा अभ्यास अंतर्भूत केला) ह्याचाच अर्थ व्यक्ती बरोबर कोणी पुरुष व्यक्ती (रवि) आणि नेपच्यून (नेपच्यून हा बेशुद्धाअवस्थेत नेणारा ग्रह आहे ) असल्या कारणाने शेखरला भूल दिली असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. 

व्यक्ती परत केंव्हा येईल ?

शासक ग्रहांमध्ये दोनदा शनि आणि एकदा गुरु जे Slow Moving Planets असल्याने शेखर आजच्या आजच घरी येईल असे वाटत नाही. 

शासक ग्रहांनुसार गुरु ग्रह चतुर्थाचा कार्येश असला तरी बाकी शनि आणि राहू अष्टम,व्यय आणि सप्तम स्थानाचे कार्येश आहेत. त्यामुळे व्यक्ती घरी जरी आली तरी व्यक्तीला अत्यंत गंभीर स्वरूपाची इजा झाली असण्याची शक्यता नाही Guarantee आहे

तेंव्हा एकूण विचार करता मी ज्योतीला उत्तर दिले कि, 

१) शेखर कुठेतरी अडकला असण्याची शक्यता आहे. गंभीर स्वरूपाने त्याला इजा झालेली असावी. तो घरी नक्की परतेल परंतु माझे शास्त्र असे सांगते कि काहीतरी गोष्ट शेखरने लपवली असावी आणि त्याचाच परिणाम आज त्याला मिळतोय जसे कि, कोणाकडून उधार घेतले असावेत आणि ते परत दिले नसतील व म्हणूनच अशा व्यक्तींकडून त्याला मारहाण वगैरे झाली असावी. 

२) शेखर जरी परत आला तरी धडधाकट परत येईल ह्याची शाश्वती नाही. तेंव्हा सांभाळून. 

३) चंद्र व्ययात असल्याने मी पोलिस चौकीत रीतसर तक्रार नोंदवून हॉस्पिटलमध्ये वगैरे तपासण्यास सांगितले. 

४) शेखरला घरी परतायला वेळ लागेल म्हणजेच आजच परत येईल असे नाही असे तिला सांगितले. (शासक ग्रहांमध्ये गुरु एकदा तर शनि दोनदा आलेला आहे. Slow Moving Planets ) 

५) कुंडलीत अष्टमात असल्येल्या मंगळ व राहू ह्यांची युती आणि शनिमुळे आणि व्ययात असल्येल्या रवि चंद्र नेपच्यून युती ह्यामुळे प्रकरण बरेच गंभीर असलेले दिसतेय तेंव्हा शेखरच्या पत्नीला काही उपाय करण्यास दिले. 

त्याच दिवशी साडे चार वाजता ज्योतीचा फोन आला. "मैडम तुम्ही सांगितले तसेच झाले ……… ".  पुढे तिने दिलेल्या माहितीनुसार,  

१) दिलेले सर्व उपाय शेखरच्या पत्नीने केले. 
२) शेखर दुपारी सव्वा तीन आणि साडे तीनच्या सुमारास घरी परत आला. (कर्क लग्नावर ) 
३) घरात आल्या आल्याच तो खाली कोसळला. त्याला कोणीतरी गंभीररित्या मारहाण केलेली दिसत होती. तो अजिबात शुद्धीत नव्हता. त्याच्या पाकिटातील पैसे,कार्डस सर्व गायब होते. (कार्डस वापरून सर्व पैसे काढण्यात आले होते हे मागाहून पोलीस तपासणीत कळले)
४) त्याला ताबडतोब हॉस्पिटलला भरती करण्यात आले. पोलीस आणि घरच्यांनी वारंवार विचारल्यानंतरही कुठल्याही प्रश्नाचे उत्तर शेखरने दिले नाही. किंबहुना आल्यापासून तो बोलतच नाहीये आणि नुसताच शून्यात पहात राहतो असे घरच्यांचे म्हणणे आहे. त्याला नेमके काय झाले आहे ते येत्या काही काळात कळेल अशी अशा आहे. 

पुढे जी काही माहिती मिळेल ती ज्योती मला कळवेलच.

Note : ज्योतीने पहिल्यांदा फोन केला तेंव्हा व्ययात अमावास्या योग होत आहे. ही अमावास्या त्यादिवशी शेखरच्या मूळ कुंडलीत सप्तम स्थानात होत होती. सप्तम स्थान हे मारक स्थान मानले जाते.  इथे मी वर्तवल्येल्या सर्व गोष्टींपैकी शेखर त्याच दिवशी परत येणार नाही हे एकच माझे वर्तवलेले भविष्य चुकले.  

  प्रश्न कुंडली आणि शासक ग्रहांनी स्पष्टपणे किंबहुना ठळकपणे घडल्येल्या घटनेचे स्वरूप दर्शविले आणि शेखर परत येईल ह्याची शाश्वती दिली. ह्या शास्त्राचे आणि शास्त्राचा सातत्याने अभ्यास करून संशोधन करणाऱ्या ज्योतिषांचे आभार मानावे तितके कमीच. त्या सर्वांनाच माझे कोटी कोटी प्रणाम.  

ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com


READERS ALL OVER THE WORLD