शनिवार, ९ डिसेंबर, २०१७

प्रश्न कुंडली म्हणजे काय ?

प्रश्न कुंडली म्हणजे काय ?


प्रश्नकुंडली हा शब्द जरी नवीन वाटत असला तरी ही संकल्पना नवीन नाही. ही एक शास्त्रीय पद्धत आहे ज्यायोगे ठराविक प्रश्नाचे उत्तर मिळू शकते. जन्मकुंडली,प्रश्नकुंडली आणि नंबर कुंडली ह्या पद्धतीने तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात. ज्योतिष शास्त्र हे अत्यंत गहन शास्त्र आहे. त्याचा संपूर्ण अभ्यास होणे हे मला अशक्य वाटते. प्रत्येकाने तो विषय आपल्या पद्धतीने समजून घेतला. त्या पद्धतीत "प्रश्न कुंडली"चा सखोल अभ्यास आहे.

प्रश्न कुंडली म्हणजे ज्यावेळी तुमच्या मनात प्रश्न उद्भवला जातो तो दिवस आणि वेळ ह्याची एक कुंडली मांडली जाते. माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की ह्या प्रश्न कुंडलीवरून दिलेली उत्तरे जन्मकुंडलीवरून दिलेल्या भाकितांपेक्षाही अचूक ठरतात. ह्यासाठी प्रश्नकुंडली आणि जन्मकुंडली ह्यातील फरक जाणून घ्या. जन्म कुंडली म्हणजे तुमच्या जन्माच्या दिवशी आणि ज्या वेळी जन्म झाला त्यावेळेची एक ग्रह स्थिती आकाशात असते. ही ग्रह स्थिती मांडणे म्हणजेच "जन्म कुंडली". जन्म कुंडली म्हणजे फक्त राशी जाणणे नव्हे तर जन्मकुंडलीवरून तुमचे संपूर्ण आयुष्य कसे असेल, तुमच्या कामाचे स्वरूप, तुमचे शिक्षण,वैवाहिक सौख्य,तुमची आयुष्यात होणारी प्रगती ह्या सर्वांचा आढावा घेता येतो. परंतु जेंव्हा एखादा "Specific" प्रश्न विचारला जातो तेंव्हा जन्मकुंडलीवरून उत्तरे देणं शक्य नसत. उदारहरणार्थ तुमची अमुक अमुक एखादी वस्तू हरवली आहे ? ह्या प्रश्नासाठी तुमच्या जन्मकुंडलीवरून देता येणं शक्य नाही. त्यासाठी ज्यावेळेस तुम्ही हा प्रश्न ज्योतिषाला विचारात तेंव्हा ज्योतिषी त्या दिवसाची आणि त्या वेळेची कुंडली मांडली जाते. त्या कुंडलीलाच प्रश्न कुंडली संबोधले जाते. ह्या प्रश्नकुंडलीवरून तुमची हरवलेली वस्तू कुठे आहे ? कुठच्या स्वरूपात आहे ? ही वस्तू कधी मिळेल ह्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे मिळू शकतात.


बऱ्याच व्यक्तिंना त्यांची जन्म तारीख माहित असते परंतु जन्मवेळ माहित नसते. काहींचा गावी जन्म झालेला असतो किंवा इतर काही कारणामुळे जन्मवेळ माहित नसते अशा लोकांसाठी प्रश्नकुंडली हा उत्तम उपाय आहे. ह्या प्रश्न कुंडलीवरून तुम्हांला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात. ज्यांना आपली जन्म तारीख किंवा जन्मवेळ दोन्हीहीची कल्पना नसेल तर प्रश्नकुंडली हा उत्तम पर्याय आहे. परंतु एका वेळेस एकच प्रश्न विचारल्यास उत्तर मिळू शकेल. 


ह्या प्रश्न कुंडलीचा उपयोग हा - १) हरवलेली वस्तू शोधण्यासाठी, २) बेपत्ता व्यक्तिंसाठी ३) चोरी झालेल्या गोष्टींसाठी ४) नवीन एखादी गोष्ट घेतल्यास फायदा होणार आहे की नाही हे जाणण्यासाठी, ५) नवीन जागेत पैसे गुंतवावेत की नाही हे जाणून घेण्यासाठी ६) तुम्हांला अमुक अमुक नोकरी मिळेल का ह्या प्रश्नासाठी ७) बाळ होईल किंवा नाही ? ८) वारसाहक्काने प्रॉपर्टी मिळेल का ? ९) कोर्टकचेरीत यश मिळेल का ? १०) परदेशात जाता येईल का ? किती काळ वास्तव्य असेल हे जाणून घेण्यासाठीही होऊ शकतो.


प्रश्नकुंडली संदर्भात मला व्यक्तिशः असे वाटते की,


१) ज्या व्यक्तिला प्रश्न विचारायचा आहे त्याने प्रत्यक्षात ज्योतिषाकडे जाऊन प्रश्न विचारावा.

२) ज्या व्यक्तिबद्दल प्रश्न विचारायचा आहे ती व्यक्ति स्वतः प्रश्न विचारू शकत नसेल तर त्या व्यक्तिच्या नजीकच्या नातलगांनी प्रश्न विचारल्यास उत्तर अचूक मिळू शकेल. 
३) प्रश्न विचारण्याआधी प्रश्नकर्त्याने मन प्रश्नावर संपूर्णपणे केंद्रित करावे आणि मगच प्रश्न विचारावा. 
४) प्रश्न हा एका वेळी एकाच विषयबद्दल विचारावा आणि सकारात्मक असावा. ह्याचा अर्थ असा की समजा प्रश्न ईस्टेटीसंदर्भात असेल तर विचारतांना प्रॉपर्टीबद्दलचेच प्रश्न असावेत. मध्येच दुसऱ्या विषयावर प्रश्न विचारू नये. सकारात्मक प्रश्न ह्याचा अर्थ प्रश्न विचारतांना - मी ही प्रॉपर्टी घ्यावी का ?  असा प्रश्न असावा. मी ही प्रॉपर्टी घ्यावी की नाही ? असे दोन्ही पद्धतीचे प्रश्न असू नयेत. 
५) प्रश्न विचारतांना त्यात फार उपप्रश्न (Sub- Questions )असू नयेत. 

प्रश्नकुंडली ही दोन्ही पद्धतीने पहाता येते. वर म्हणाल्याप्रमाणे ज्योतिष शास्त्रात वेगवेगळ्या पद्धती आहेत. कुंडली विवेचन हे पारंपरिक पद्धतीने,कृष्णमूर्ती पद्धतीने, फोर स्टेप पद्धतीने,कस्पल इंटरलिंक पद्धतीने केले जाते.  भारतामध्ये ८५% ज्योतिषी अजूनही पारंपरिक पद्धतीने कुंडली विवेचन करतात. कृष्णमूर्ती पद्धतीचा वापर अजून व्यापक झालेला नाही. पारंपरिक पद्धतीच्या पुढचा अभ्यास म्हणजेच "ऍडव्हान्स पद्धती" म्हणून के. पी. पद्धतीकडे किंवा कृष्णमूर्ती पद्धतीकडे पाहिले जाते. कृष्णमूर्ती पद्धतीत काही किचकट गणिते आहेत. ज्यामुळे उत्तर अचूक येण्याचे प्रमाण जास्त आहे. ह्या कृष्णमूर्ती पद्धतीत अजून एक पद्धत प्रश्न विचारण्यासाठी वापरली जाते आणि ती म्हणजे - नंबर कुंडली. ह्या नंबर कुंडलीत जातकाला (प्रश्न कर्त्याला ) १ ते २४९ ह्या नंबरमधील एक नंबर निवडण्यास सांगितलं जातो. जातक जो नंबर देतो त्या नंबरची एक कुंडली मांडली जाते आणि उत्तर देता येते. अशा २४९ कुंडल्यांचा संच तयार असतो. प्रत्येक दिवसाप्रमाणे आणि वेळेप्रमाणे त्यात बदल करून उत्तर देता येते. ह्याला ज्योतिष शास्त्रीय आधार आहे. तो समजण्यास किचकट आहे म्हणून इथे सध्या त्याबद्दल सांगत नाही. 


ह्या सर्व गोष्टींबरोबरच जो उत्तर देणार त्या ज्योतिषाचेही लक्ष केंद्रित असावे. त्याच्या मानसिक स्थिरतेवरही उत्तर चूक किंवा बरोबर येणे अवलंबून असते. जर ज्योतिषी स्वतः आजारी आहे, फार घाईघाईत प्रश्नकुंडली अभ्यासल्यास उत्तर चुकू शकते. काही वेळेस जातकांकडून अत्यंत घाई दर्शवली जाते. आताच प्रश्नकुंडली बघून सांगा, ५ मिनिटांत फोन करतो लगेच सांगा अशा विनंत्या होत असतात. परंतु ज्योतिषी हा मशीन नसून मनुष्य आहे ही गोष्ट काही वेळेस जातक विसरून जातात. असे होऊ नये. कुंडलीवरून उत्तर देणे म्हणजे stock मधील सामान काढून तुम्हांला देणे एवढे सोपे नाही. ज्योतिषाला एका प्रश्नाचे उत्तर देण्यास वेळ लागू शकतो. तेंव्हा धीर धरा. तुम्हांला तुमचे उत्तर नक्की मिळेल. 


आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. 

अनुप्रिया देसाई 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

READERS ALL OVER THE WORLD